गुटखा छाप्यात दोघांना अटक : कोरेगाव तालुक्यात चारचाकी गाडीसह 12 लाख 85 मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरेगाव | पिंपोडे बुद्रुक व पिंपोडे खुर्द या दोन ठिकाणी गुटख्याच्या छाप्यात एका चारचाकी गाडीसह 12 लाख 85 हजार रूपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आले आहेत. कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, वाठार पोलीस व अन्न-औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गुटख्याचा साठा व विक्री व्यवसाय चालू असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांना मिळाली होती. खबरीच्या अनुषंगाने किंद्रे यांनी साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच वाठार पोलिसांच्या संयुक्तपणे कारवाई केली. पिंपोडे बुद्रुक व पिंपोडे खुर्द गावच्या हद्दीत पिंपोडे बुद्रुक येथील जितेंद्र नारायण पवार व दादा नारायण पवार यांच्या किराणा दुकानाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा व पानमसाला असा एकूण 2 लाख 31 हजार 618 रुपयाचा माल ताब्यात घेतला.

तसेच पिंपोडे खुर्द येथील संतोष भरत कदम यांच्या चारचाकी गाडी क्रमांक (एमएच- 11 बी व्ही- 6700) मध्ये 94 हजार 18 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह किंमत रुपये 10 लाख 54 हजार 18 असा दोन्ही ठिकाणाहून एकूण 12 लाख 85 हजार 636 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये जितेंद्र पवार व संतोष कदम या दोघांना वाठार पोलिसांनी अटक केली असून दादा पवार हा फरार झाला आहे. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार कमलाकर कुंभार, साहिल झारी, हेमंत शिंदे, अजय गुरव, श्रीकांत खरात, तुषार ढोपरे, अनिल पवार, आर. आर. शहा यांनी केला. पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.

Leave a Comment