कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बेलवडे हवेली (ता. कराड) येथे छापा टाकून अवैध पिस्तूल बाळगल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे. तळबीड पोलिसांनी रात्री सापळा रचून योगेश पवार (वय- 37) आणि समाधान देशमुख (वय- 19, दोघे रा. बेलवडे हवेली) अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत. त्यांच्याकडून चायना बनावटीचे 50 हजारांचे पिस्तूल जप्त केले आहे.
तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेलवडे हवेलीत तळबीड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात तेथे दोघांकडे चायना बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई केली. त्यात बेलवडे हवेली येथील योगेश पवार आणि समाधान देशमुख यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मारुतीच्या मंदिरामागे एका बोळामध्ये लपवून ठेवलेले 50 हजारांचे चायना बनावटीचे पिस्तूल त्यांनी पोलिसांना दाखवले. ते जप्त केले आहे. दोघांवर तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तालुक्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांनी पोलिस ठाणेनिहाय विशेष पथक स्थापन केली. तळबीडच्या पथकाची सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार सूर्यकांत देशमुख, हवालदार संदेश दीक्षित, प्रवीण फडतरे, नीलेश विभूते यांनी कारवाई केली. प्रवीण फडतरे यांनी फिर्याद दिली आहे.




