विजेचा शोक लागून दोन भावांचा जागीच मृत्यू; गावावर शोककळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना – जनावरांसाठी कुट्टी मशीनमधून चारा बारीक करीत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. पवन गजानन घोडे (22), सचिन रामकीसन घोडे (23) असे या घटनेत मयत झालेल्या भावांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावातील पवन व सचिन हे दोघे सख्खे चुलत भाऊ भोकरदन येथे दुचाकी गॅरेजवर काम करतात. मंगळवारी सकाळी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने दोघेही घरीच होते. यादरम्यान पावसाने उघडीप दिल्याने जनावरांना खाण्यासाठी चारा बारीक करावा यासाठी त्यांनी कडबा कटर (कुट्टी मशीन) चालू केले. मात्र, पावसाने तारा व विजेचा बोर्ड ओला झालेला असल्याने अगोदर पवन याला विजेचा शॉक लागला त्याला वाचविण्यासाठी सचिन गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन्ही भावांचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला.

यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सोनी व डॉ. सविता म्हेत्रे यांनी दोघांना मृत घोषित केले. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment