Wednesday, June 7, 2023

दोन कारच्या भीषण अपघातात तरुण शास्त्रज्ञासह पत्नी जागीच ठार; गाड्यांचा झाला चक्काचुर

सांगली | विट्याहुन पुसेसावळीकडे जाणाऱ्या व तिकडून विट्याकडे येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. या अपघातात तरुण शास्त्रज्ञासह IT कंपनीत काम करणार्‍या पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम (रा. विटा) अशी या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. हा अपघात नेवरी (ता. कडेगाव) येथे आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला.

डोंगरसोनी येथील कपिल झांबरे व त्यांची पत्नी धनश्री आणि प्रज्वल कुंडलिक झांबरे असे तिघेजण त्यांच्या कारने तासगावहुन पुण्याकडे निघाले होते. तर विटा येथील सुदर्शन गजानन निकम व संग्राम संजय गायकवाड हे दोघेजण खेराडे येथून विट्याकडे येत होते. त्यावेळी नेवरी गावाजवळ या दोन कारची समोरासमोर धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीतील कपिल व त्यांची पत्नी धनश्री झांबरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारीतील सुदर्शन निकम हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कराड येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात डोंगरसोनी येथील प्रज्वल झांबरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथे आहेत. तर संग्राम गायकवाड हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच विटा व कडेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील पती- पत्नीचे मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघातात दुर्दैवी अंत झालेले कपिल व त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे या उच्चशिक्षित आहेत. कपिल हे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी नुकतीच इस्रोची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांना यश मिळाल्याने त्यांची निवड दिल्ली येथे इस्रोमध्ये झाली होती. तर त्यांच्या पत्नी धनश्री या अभियंता आहेत. या अपघातात ठार झालेले विटा येथील सुदर्शन निकम हे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे चिरंजीव आहेत. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.