नदीत अवैध वाळूच्या परस्पर वादातून दोन गाड्या पेटवल्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

चितळी (ता. खटाव) येथील टेंभू जलसेतुच्या खाली असणाऱ्या येरळा नदी पात्रालगत शुक्रवारी सकाळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली. सदर घटनास्थळी तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाने तातडीने भेट देत पाहणी केली असता. अवैध वाळू वाहतूक करताना परस्परात झालेल्या वादातून सदर गाड्या जाळण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र व तहसील कार्यालय वडूज येथून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार सकाळी येरळा नदी पात्रा लगत अर्धवट जळालेल्या व चिखलात अडकून एकमेकांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत अशोक लेलंड व टाटा पिकअप या दोन गाड्या आढळून आल्याने चितळी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती महसूल व पोलीस विभागास दिली. माहिती मिळताच तलाठी माळी व पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

सदर घटना ही अवैध वाळू वाहतुकीतुन परस्पर वादातून हा प्रकार घडला असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आर. एस. माळी, पोलीस पाटील ज्योती गायकवाड, सरपंच सतीश भिसे, ग्रामसेवक अधिकारी एम. बी. माळी, कोतवाल शशिकांत भिसे यांनी सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. तर वडूज पोलीस स्टेशनचे सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास नानासो कारंडे करीत आहेत. चितळी गाव हद्दीतून वाहणाऱ्या येरळा नदीतून अवैध वाळू उपशास ग्राम वाळू समितीच्या माध्यमातून बंदी असतानाही वाळू चोरीच्या घटना वारंवार याठिकाणी घडत आहेत. यासंबंधी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास निवेदन देण्यात आल्याचे सरपंच सतीश भिसे यांनी सांगितले आहे.