सातारा : वाई शहरातील दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर वाईस सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती शाळांच्या आवारात मुलांची आणि काळजी घेण्याचे आवाहन वाई च्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने देखील केले होते या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, पण बेपत्ता झालेली ही दोन मुले पैसे संपल्यावर पनवेल मध्ये सापडली.
अर्थात ती मुले जिवाची मुंबई करण्यासाठी बेपत्ता झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या बेपत्ता मुलांची तक्रार वाई पोलिस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून वाई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, फौजदार कृष्णा पवार, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, श्री. जाधव यांनी शोध मोहीम गतीमान केली.
दरम्यान फौजदार कृष्णा पवार यांना महाड पोलिस ठाण्यातून तेथील अधिकाऱ्यांनी वाई मधील दोन मुले महाड मध्ये आली असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच वाई पोलिसांचे पथक महाडला पोहचले, पण दुर्दैवाने ती मुले तो पर्यंत तेथून पळून गेली होती. या मुलांनी जिवाची मुंबई करण्यासाठी पलायन करत महाड हर्णे बंदर आणि पुढे पनवेल अशा ठिकाणी फिरत मजा केली.
पण पैसे संपल्यावर साजीद मुलाणी याने आमच्या
जवळचे पैसे संपले आहेत, आम्हाला घेऊन जा असा फोन केला. साजीद मुलाणी आणि किशोर जमदाडे यांच्या पालकांनी मुले आणून वाई पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी आवश्यक कारवाई आणि कागदपत्रांची पुर्तता करुन मुले पालकांच्या ताब्यात दिली. ही माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ही दोन्ही मुले सुखरूप घरी परतल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. अर्थात वाई पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन शाळकरी मुले बेपत्ता असल्याचा मजकूर वापरून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले होते, त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. यावरूनही काही पालकांनी नाराजी व्यक्त केली