व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात; दोन चालक जखमी

कराडनजीक पेरले गावच्या हद्दीत घटना : वाहनांचे मोठे नुकसान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरीळ कराड तालुक्यातील इंदोली येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील पेरले गावच्या हद्दीत तिहेरी अपघाताची घटना घडली. या अपघातात एसटी चालकाने ब्रेक मारल्याने त्याच्या मागे असलेल्या अयशर गाडीने जोरदार धडक दिली व त्या पाठोपाठ आणखी दुसऱ्या गाडीने धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्याचे चालक किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर इंदोली येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सर्विस रस्त्यावरून महामार्गावरील वाहनांची वाहतूक होत आहे. मात्र सर्विस रस्त्यावरील खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम होत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघाताच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांची एकमेकांना धडक बसली. या धडकेत तिन्हीही वाहनाचे नुकसानही झाले.

बुधवारी सकाळी महामार्गावरून वाहने जात असताना एसटी चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर एसटीच्या पाठीमागून येणाऱ्या आयशर गाडी (एमएच 14, एएस 7982) ने पाठीमागून जोराची धडक दिली. आयशर गाडी चाकणारे अचानक ब्रेक मारल्यामुळे त्याच्या मागून आणखी एक आयशर गाडी (एमएच 12 पीक्यू 7293) ने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोन्ही आयशर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महामार्गावरच झालेल्या या तिहेरी अपघातात आयशर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकही किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा हे आपल्या इतर सहकाऱ्यांसमवेत अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचारी महेश होवाळ, सोहेल सुतार, अजिम सुतार, उंब्रज पोलिस स्टेशनचे कर्मचारी याच्या मदतीने क्रेनच्या साहयाने वाहनांतीळ जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरील एकमेकांना धडकलेली वाहने बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली.