कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील घारेवाडी येथे किरकोळ कारणावरून तलवार, गुप्ती, दगडाने दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये यामध्ये दोन्हीकडील सहा जण जखमी झाल्याची सोमवार दिनांक 29 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तलवार, गुप्ती जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
राजन संभाजी ताटे, रविराज संभाजी ताटे, नंदा संभाजी ताटे, संभाजी जगन्नाथ ताटे, अनुप साळुंखे व संताजी साळुंखे अशी दोन्हीकडील जखमींची नावे आहेत. तर राजू बबन साळुंखे, चेतन बबन साळुंखे, अनुप अरुण साळुंखे, नाथा बाळू साळुंखे, व संताजी साळुंके (सर्व रा. घारेवाडी, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर राजन ताटे, रविराज ताटे, संभाजी ताटे तिघेही (रा. घारेवाडी, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी संभाजी जगन्नाथ ताटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजन ताटे हा शेनाची पाटी टाकण्यासाठी रस्त्यापलीकडे उकिरड्यावर गेला होता. त्यावेळी चेतन साळुंके याने मोटरसायकलवरून जात असताना राजनला जोरात कट मारला, म्हणून राजनने त्याच्याकडे बघितले. त्यानंतर घरी येऊन राजन याने घडला प्रकार वडील संभाजी ताटे यांना सांगितला. त्यानंतर घरातील सर्वजण जेवणखाण करून बसले असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजू साळुंके, चेतन साळुंखे, अनुप साळुंके, नाथा साळुंके व संताजी साळुंके यांनी येऊन संभाजी ताटे यांच्या घरात घुसून दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी राजन ताटे याच्यावर तलवार हल्ला केला. त्यामुळे राजन जमिनीवर कोसळला. त्यावेळी नंदा साळुंके व रविराज साळुंखे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता संशयितांनी रविराज याच्यावर गुप्तीने वार केले. तसेच त्यांनी नंदा ताटे व संभाजी ताटे यांनाही दगडाने मारहाण करून जखमी केले. यावेळी पोलीस पाटील संदीप वगरे यांनी तेथे येऊन भांडण सोडवले. त्यानंतर जखमींवर कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी संभाजी जगन्नाथ ताटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू साळुंके, चेतन साळुंखे, अनुप साळुंखे, नाथा साळुंके, व संताजी साळुंखे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस विठ्ठल खाडे करत आहेत.
याउलट चेतन भरत साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, राजन ताटे हा साळुंखे यांच्या घरासमोर उभा राहून काहीही कारण नसताना शिवीगाळ करू लागला. याबाबत याला विचारणा केली असता राजन ताटे याने संताजी साळुंके यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. तसेच या वेळी झालेल्या झटापटीत अनुप साळुंखे हे जखमी झाले. त्यानंतर जखमी संताजी साळुंखे यांच्यावर कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवले. याबाबतची फिर्याद चेतन भरत साळुंखे यांनी पोलिसात दिली असून राजन ताटे, रविराज ताटे व संभाजी ताटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेमंत कुलकर्णी करत आहेत.