सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (ता. सातारा) येथे भरधाव दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकून दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. आदेश विलास साळुंखे (वय- 21, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा), पारस संभाजी डफळे (वय- 16, रा. वजरोशी ता. पाटण) अशी अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा पध्दतीने दोन मित्रांच्या अपघाती मृत्यून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणेहून आदेश साळुंखे व पारस डफळे दुचाकीवरून गाडीची बॅटरी बदलण्यासाठी साताऱ्यात येत होते. त्यावेळी खिंडवाडीजवळ पुढे निघालेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकी जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, आदेश साळुंखेचा जागीच मृत्यू झाला तर पारस हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आदेश साळुंखे हा एका अॅकडमीमध्ये सैन्य दलात भरती होण्यासाठी नागठाणे येथे सराव करत होता. तर पारस हा पंजाब येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. तो दोन दिवसांपूर्वी गावी आला होता. मित्रासोबत जाताना त्याच्यावरही काळाने घाला घातला. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.