सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
स्थानिक गुहे अन्वेषण विभागाने पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शिराळा बायपासरोड कापरी फाटा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीची २ पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे असा १ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील चेतन महाजन यांना शिराळा बायपास रोड, कापरीफाटा येथे एक इसम पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा लावला. तेथे राखाडी रंगाचा टीशर्ट आणि निळ्या जीन्स घातलेला एकजण हातात पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसले. पथक त्याला दिसल्यावर तो पळून जाऊ लागला. यावेळी पथकातील पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
पोलीस उपनिरीक्षक अंतिम खाडे यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केला असता त्याने आपले नाव राहुल तानाजी ठोमके असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीत देशी बनावटीची २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला. त्याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात आर्मऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक अंतिम खाडे, राजू कदम, राहुल जाधव, सुनील चौधरी, मछिंद्र बर्डे, सुहेल कार्तीयानी, अरुण सोकटे यांनी पार पडली.