वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात 2 ठार तर 5 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे ठार झाले तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ आज सकाळी झाला. अपघातातील मृत हे सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावचे असून ते बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले होते. या अपघातात पृथ्वीराज दौलतराव चव्हाण आणि पत्नी प्रियांका पृथ्वीराज चव्हाण असे ठार झालेल्यांची नावे आहेत तर विलास महादेव माने, अनिता विलास माने, विजया विवेके चव्हाण आणि विवेक बुधाजी चव्हाण असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील चव्हाण आणि माने कुटुंबीय मिळून असे सहाजण कारमधून बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी पहाटेच्या सुमारास फॉर्च्युनर कार (क्र. के. ए. २३ एम ७०७४) मधून निघाले होते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ पोहोचताच एक वारकरी रस्ता ओलांडत होता. अचानक समोर आलेल्या वारकऱ्याला वाचवण्याच्या नादात चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील पृथ्वीराज चव्हाण आणि प्रियांका चव्हाण दोघे पति-पत्नी जागीच ठार झाले, तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला धडकल्यानंतर पाच वेळा पलटली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातानंतर पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमध्ये विलास माने, अनिता माने, विजया चव्हाण, विवेक चव्हाण यांचा समावेश आहे. या अपघातानंतर कसबेडिग्रज गावावर शोककळा पसरली होती. अपघातात गाडीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

Leave a Comment