पाचशे रुपयांसाठी पोलिसांमध्ये ठाण्यातच तुंबळ हाणामारी

औरंगाबाद । सध्या सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असतानाच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे.

सूत्रांनि दिलेली अधिक माहिती अशी की, सोयगाव ठाण्यातील चौधरी व शिंदे नावाच्या दोन कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर त्यांची समजूत काढत सहकाऱ्याने पोलिस ठाण्यात आणले. मात्र, पोलिस ठाण्यात पुन्हा या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत चौधरी नावाचा कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांना बनोटी दुरक्षेत्राचे बिट जमादार दिलीप तडवी यांनी उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी न्याय वैद्यकीय तक्रार सोयगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र अशा प्रकारे पोलिसांनी फ्री स्टाईल हाणामारी केल्याने तालुक्यात या घटनेची खमंग चर्चा सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group