Wednesday, February 1, 2023

सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील २ पोलिस पॉझिटिव्ह, राज्यभरात सुमारे ३०० हून अधिक पोलिस कोरोनाग्रस्त

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेल्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तो भाग नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंधित केला असून त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

कोरोनाच्या वैश्विक संकटाला हद्दपार करण्यासाठी राज्यभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, आज ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या आणि शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारील ग्रामीण मुख्यालयाचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत सोलापुरात सापडलेल्या 111 रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील दोनच रुग्ण आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडी तर मोहोळ तालुक्यातील पाटकुल याठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, ग्रामीण मुख्यालयात राहणाऱ्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमका कुठे होता, त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणाच्या संपर्कातून कोरोना झाला, याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरु झाला आहे.

राज्यभरात सुमारे तीनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना शहरापासून चार हात लांब होते. मात्र, शनिवारी ग्रामीण मुख्यालयात राहणारे दोन पोलीस कर्मचारी कोरून पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे. ते दोन पोलीस कर्मचारी कोणत्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते याची माहिती तूर्तास मिळू शकली नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.