सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून तसेच पोलिसांनाच मारहाण करून पाच दरोडेखोर पसार झाल्याची घटना काल (सोमवारी) पहाटे 3 वाजता काल घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत औंध परिसरातून राहुल भोसले याला तर जोतिबा डोंगर पायथ्याशी पोल्ट्री फार्मजवळ सचिन भोसले याला जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी औंध पोलीस ठाण्यातील लॉकअपम्हून पाच दरोडेखोर पसार झाले. या घटनेनंतर कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह पोलीस अधिकारी औंध येथे दाखल झाले. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना घटना घडल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती घेत घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले.
दरम्यान काल दिवसभरात पोलिसांनी औंधसह इतर परिसर चांगलाच पिंजून काढला. त्यांच्या या शोध मोहिमेत फरार आरोपींपैकी राहुल भोसले याला औंध परिसरातून तर सचिन भोसले याला जोतिबा डोंगर पायथ्याशी एकाला पोल्ट्री फार्मजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. फरार असलेल्या पाच आरोपीचे फोटो आणि वर्णन सातारा पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.
सहा महिन्यात दुसरी घटना
आरोपींना पकडण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस ताब्यात घेतात. ते पळून जाऊ नये म्हणून कडक सुरक्षा ठेवतात. तसेच त्यांना ज्या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्यात येते तेथेही पोलीस बंदोबस्त तैनात असतो. मात्र, काल कुख्यात दरोडेखोरांसारखे आरोपी पळून जाण्याची घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप शंका व्यक्त केली जात आहे. तसेच सहा महिन्यात आरोपी पळून जाण्याची ही दुसरी घटना असल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.