सासुरवाडीला जाताना पती- पत्नी अपघातात ठार : दुचाकी- कारची समोरासमोर धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वडगाव (ता. माण) येथील पती- पत्नी दुचाकी आणि कारच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली. मधुकर नरसू ओंबासे (वय- 57) व लक्ष्मी मधुकर ओंबासे (वय- 50, रा. वडगाव, ता. माण) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्यांचे नाव आहे. सासुरवाडीला सासूला पाहण्यासाठी जाताना अज्ञात कारने धडक दिली असून कारचालक गाडीसह फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी दि. 20 जुलै रोजी मधुकर ओंबासे व त्यांची पत्नी लक्ष्मी ओंबासे हे दाम्पत्य दुचाकी (क्र. एमएच- 11 एएम- 7978) वरुन तडवळे (ता. खटाव) येथील सासुरवाडी निघाले होते. वडगावपासून काही अंतरावर असणार्‍या जुन्या शिंगणापूर रस्त्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरुन सुसाट आलेल्या कारची जोराची धडक बसली. या अपघातानंतर कारचालक न थांबता त्याने फलटणच्या दिशेने कार नेली.

या धडकेत ओंबासे दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी दाम्पत्याला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना सातारा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, या जखमी दाम्पत्यापैकी लक्ष्मी ओंबासे यांचा सातार्‍यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर मधुकर ओंबासे यांना पुढील उपचारासाठी सातारहून पुण्याला नेताना मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ओंबासे दाम्पत्यावर वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची फिर्याद ओंबासे यांचे पुतणे दिलीप ओंबासे यांनी दिली असून दहिवडी पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार खांडेकर करत आहेत.