मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे. ५ लाख रूपये किंमतीच्या तब्बल १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता बुधवार दि. ८ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील विजय कोळी, अक्षय सोनवणे, निलेश राठोड, सलिम शेख या चौघांना जेरबंद करण्यात आले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता इस्लामपूर, पलूस, कुरळप, आष्टा, कोल्हापूर व पुणे अशा विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या १६ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. मोटरसायकल टोळीतील चौघेही सराईत चोरटे आहेत. विजय कोळी याच्यावर चोरी व अपहरणाचा गुन्हा नोंद आहे. तर अक्षय सोनवणे, निलेश राठोड, सलिम शेख हे तिघेजण मोटरसायकल चोरीसाठी पश्चिम महाराष्ट्रात सक्रियपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. चौघांना जेरबंद केल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कसून तपास सुरू आहे.