सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिरवळ येथे कामावर निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय 30) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, शिरवळ येथील एमआयडीसीत माण येथील सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे कामाला आहेत. ते कामावर हजर होण्यासाठी कंपनीत निघाले होते. दरम्यान आज सकाळी ते दुचाकी क्रमांक एमएच 11 डीसी 8927) वरून निघाले होते.
पांगरीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची ट्रक (क्रमांक एमएच 12 एफ झेड 8977) ने जोरदार धडक झाली. यामध्ये दोघांनाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. यात गंभीर मर लागल्याने सूर्यकांत याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश गंभीर जखमी झाला आहे. सूर्यकांत जाधव याचा गेल्या दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.