सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आज ज्या लोकांनी पदावर तुम्हांला, मला लोकप्रतिनिधी म्हणून बसवले आहे, त्यांनाच आता देशोधडीला लावले जात आहे. तुम्ही ताकदवान आहात म्हणून कामगारांवर अन्याय करायचा का? कामगारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. आता राजेशाही असती तर अन्याय करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, तुम्ही आत्मदहन कशाला करता? ज्यांनी हे घडवून आणले त्यांचे दहन करा, असा सल्लाही खा. उदयनराजे यांनी कामगारांना दिला.
सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्हची जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खरेदी केली असून, त्या जागेवरून कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या कर्मचाऱ्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारले की, मागितलेली माहिती सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना काही वेळ दिलाय का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ”त्यांना संध्याकाळच्या बैठकीत समजावून सांगतो. इतर भाषेत समजत नसेल तर त्यांना दुसऱ्या भाषेतच सांगावे लागेल. बघू मग कसं समजत नाही ते. लोकशाही अशीच असते. राजेशाहीची मागणी करा. हत्ती आणतो तिथं आणि त्यांना चिरडतो.”
संगनमताने 42 कोटीची जागा 8 कोटींना
बँक, एमआयडीसीचे अधिकारी आणि इतरांशी संगनमत करत काही जणांनी पंडित ऑटोमोटिव्हची 42 कोटींची जागा 8 कोटींना दिली आहे. आम्ही काही माणसे देतो ती 16 कोटी देतील त्यांना जागा द्या कशाला कामगारांचे नुकसान करता? असा खडा सवालही उदयनराजेंनी केला. एखाद्यावर अन्याय होत असल्यास मी सहन करणार नाही. आज सातारा एमआयडीसी नावारूपाला यायला पाहिजे होती. पण अनेक कंपन्या निघून गेल्या. मी या विरोधात आवाज उठवल्यानंतर माझ्यावर केसेस झाल्या. आवाज उठवल्यास मालकातर्फे खंडणीची केस माझ्यावर टाकण्यात आली. मग या कामगारांचे काय होणार? पण मी ह त्यांच्या चिंध्या होवू देणार नाही, असा इशारा छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.