हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाबळेश्वर येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या वेण्णालेकचे पालिकेच्या वतीने लाल जांभ्या दगडात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली.
महाबळेश्वर येथील भिलार येथे भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी दोन दिवसीय विशेष बैठक पार पडली. या विशेष बैठकीस सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीस खा. उदयनराजे भोसले यांनीही उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर पालिकेच्या वतीने वेण्णालेक या ठिकाणी करण्यात येत असलेल्या लाल जांभ्या दगडात सुशोभीकरणाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी खा. उदयनराजेंना कामाबाबतची सविस्तर माहिती दिली.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून वेण्णा लेक व परिसर सुशोभीकरणाचे काम केले जात आहे. येथे हेरिटेज दर्जाची लाल जांभ्या दगडातील आकर्षक स्वागत कमान, बोट क्लब कार्यालयाची नूतन इमारत, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही युनिट तसेच जेटीच्या दुरावस्थेची डागडुजी केली जात आहे.