सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.
सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. रिक्षा चालकांच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून रिक्षा व्यवसाय अडचणीत येत चालला आहे. रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली.
आ. शिवेंद्रराजेंनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली. शिवेंद्रराजे म्हणाले, की गेली पाच वर्षे त्याची आघाडी सत्तेत होती. आता पालिकेवर प्रशासक आल्यावर त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक कुठे गेले. प्रशासक आला की त्यांची सातारा शहराच्या प्रति असलेली जबाबदारी संपली का? पालिकेत गेल्या पाच वर्षात कोणी किती बिले काढली. कमिशनमधून किती मलिदा लाटला हे सगळ्यांना माहिती आहे.
सत्तेत असणारे सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व नगराध्यक्षा कुठं गेलेत. आता त्यांचे नेते निवडणूक लागली की मते मागायला येणार आहेत. त्यानंतर त्यांची नाटक, नौटंकी, मिठ्या मारणे सुरु होणार आहे. त्यावेळी तुम्हाला मतांसाठी सातारकर पाहिजेत. शाहूनगर परिसरात स्वच्छता होत नाही. स्वच्छतेचे टेंडर कोणाला द्यायचे याचा वाद आहे. कोणत्या नगरसेवकाला टेंडर द्यायचे याचा त्यांच्यात वाद आहे. ठेकेदाराची नेमणूक होत नाही.