हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेची लढत (Satara Lok Sabha 2024) रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली असून महायुतीने मात्र सावध पवित्रा घेत अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वतःचं राजकीय वजन वापरून तिकीट आपल्यालाच मिळावं याची फिल्डिंग लावलेली असली तरी भाजपने त्यांना तिकिटासाठी बरंच तंगवलं आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही. भाजपने देशभरातील आपल्या उमेदवारांच्या एकूण १० याद्या जाहीर केलेल्या असून यात उदयनराजे यांचं नाव अद्यापही आलेलं नाही. असं असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही जागा उदयनराजे आणि पर्यायाने भाजपला सोडण्याबाबत रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. अजित पवारांना उदयनराजे यांची उमेदवारी मान्य नसून जर उमेदवारी घ्यायचीच असेल तर घड्याळ चिन्हावर घ्या असा पर्याय त्यांच्याकडून देऊन झालेला आहे. मात्र उदयनराजे हा पर्याय स्वीकारायला तयार नाहीत. तसंच उदयनराजेंच्या उमेदवारीच्या बदल्यात अजित पवार उदयनराजेंची राज्यसभा मागत असल्यानं विषय हार्ड बनलाय. या सगळ्या गोंधळात उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळालं तरी त्यांच्यापुढील अडचणी कमी नसणारेत. हातातली राज्यसभा अजित पवारांना देऊन लोकसभा लढवली अन ऐनवेळी घड्याळाच्या कार्यकर्त्यांनी साथ नाही दिली तर आहे ते पण गमावण्याची वेळ राजेंवर येऊ शकते. उदयनराजे यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू लक्षात घेऊन त्यांना विजयासाठी अजित पवारांची साथ कशी लागेल हे जाणून घेऊयात…
उदयनराजे भोसले. सिर्फ नाम हि काफी है. उदयनराजे म्हटलं कि हवा, राडा, विषय खोल आणि जाळ अन धूर सगळं संगटच असतंय. जबरी फॅन फॉलोअर्स अन डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून उदयनराजेंची सगळीकडं ओळख आहे. साताऱ्यात फक्त आणि फक्त उदयनराजेंचंच चालतं हि रिएलिटी आहे. २००९ ते २०१९ असे दोन टर्म खासदार राहिलेल्या उदयनराजेंचं जिल्हाभर चांगलं नेटवर्कहि आहे. उदयनराजेंच्या वेगवगेळ्या स्टाईलचे चाहते साताऱ्यातच नाही तर राज्यभर पाहायला मिळतात. मात्र असं असलं तरी उदयनराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी भाष्य करताना साताऱ्यातील एक जाणकार पत्रकार म्हणतात, “आपण कुठून आलोय? आपण काय करतोय? आणि आपल्याला काय करायला पाहिजे? याची बिल्कुलही जाण आणि भान नसलेला नेता म्हणजे उदयनराजे.”
उदयनराजे आपल्या राजघराण्याची आब राखून जिल्ह्यात काम करू शकले नाहीत ही गोष्ट सामान्य सातरकरांना नवी नाही. साताऱ्यात मोठे उद्योगधंदे नाहीत, MIDC चा विस्तार झालेला नाही, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत, मल्टीनॅशनल कंपन्यांचं जाळं नाही, तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत आणि या सर्व समस्यांचं कारण राजघराण्यातील जबाबदार व्यक्तीची उदासीनता आहे असं सातारकर लोकांमध्ये आवर्जून बोललं जातं. सातारा शहरात उदयनराजे यांना देवाप्रमाणे मानणारे लोक असले तरी जिल्ह्याच्या इतर भागात मात्र तशी परिस्थिती नाही.
तरुणांनी वयाच्या विशी-पंचविशीत ज्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी उदयनराजे वयाच्या पन्नाशीनंतर करताना दिसतात. कुणाची पप्पी घे, कुणासोबत डान्स कर, कुठेतरी कॉलर उडव याच गोष्टी सातत्याने करत राहून त्या स्टाईलचा गवगवा करत राहणं हे सुज्ञ मतदारांना बिल्कुल पटणारं नाही. वाड्यावर गेलं, राजेंना भेटलं की काम होतंच असं सांगणारे बरेच लोक असले तरी वाड्यावर जाऊन मुजरा करून आपलं काम करून घेण्याची कोणती पद्धत किंवा प्रथा राजेंनी पाडली आहे हे कळायला मार्ग नाही. स्वतःच्या चुलतभावाशी वारंवार वादविवाद करून सातारा शहराचा विकास आपणच केला ही टिमकी वाजवण्यात उदयनराजे विशेष धन्यता मानतात. नगरपालिका, आमदारकी आणि खासदारकी या तिन्ही प्रकारच्या निवडणुकांत या दोन्ही भावांनी वेळ मिळेल तेव्हा एकमेकांची जिरवण्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली आहे. या दोघांच्या विरोधात कुणी काम करू लागतो तेव्हा मात्र दोन्ही राजे एक झाल्याचं चित्रही सातारकरांनी वेळोवेळी अनुभवलं आहे. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळतंय का हे बघणं रंजक ठरेल.
अजून उमेदवारीचा पत्ता नसला तरी उदयनराजेंनी प्रचाराला सुरवात केलीय. साताऱ्यात भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उदयनराजेंनी कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, महेश शिंदे, शंभूराजे देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रामुख्याने समावेश आहे. युतीचा भाग असलेल्या अजित पवार गटाकडून मात्र उदयनराजे यांना पाठिंबा देण्याबाबत विशेष कोणत्याही हालचाली दिसुन आलेल्या नाहीत. वाई-खंडाळा भागातील आमदार मकरंद पाटील यांनी आम्ही युतीच्या उमेदवाराचं काम करू, मात्र कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतीलच असं नाही हे सांगून उदयनराजे यांना पेचात टाकलं आहे. राष्ट्रवादी पक्षात २ गट पडले असले तरी जुने सहकारी म्हणून शशिकांत शिंदे यांना ताकद देण्याचा प्रयत्न मकरंद पाटील करतील अशाच शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
सातारा लोकसभेचा विचार करता वाई-खंडाळा, कोरेगाव आणि सातारा-जावली हे मतदारसंघ उत्तर साताऱ्याचा भाग म्हणून ओळखले जातात. तर कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे दक्षिण साताऱ्याचा भाग म्हणून ओळखले जातात. १९९९ पासूनच्या ५ लोकसभा निवडणुकांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन ज्या उमेदवाराला मदत करेल आणि कराड-पाटण भाग ज्या उमेदवाराला साथ देईल तो उमेदवार हमखास निवडून येतो हेच आकडेवाडीवरून स्पष्ट होतं. १९९९, २००४ ला कराडमधील उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी बहुमताने विजय मिळवला. तर २००९, २०१४ आणि २०१९ ला उदयनराजे विजयी झाले. या दोघांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची ताकद कामाला आली होती. मात्र तरीही २०१९ ला नरेंद्र पाटील यांची उमेदवारी उदयनराजे यांना जड गेली होती. त्यावेळी निवडून आल्यानंतर ५ महिन्यांतच उदयनराजे यांनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीत ते श्रीनिवास पाटलांकडून ८७ हजार मतांनी पराभूत झाले.
आताही महायुतीकडून उदयनराजे उमेदवार असतील तर त्याची दक्षिण साताऱ्यातील बाजू काहीशी कमकुवत असणार आहे. सातारा आणि कोरेगाव भागात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या मदतीने थोडंफार लीड घेण्याचा प्रयत्न उदयनराजे करतील. मात्र यंदाच्या निवडणुकीत डीसायडिंग फॅक्टर असेल तो वाई-खंडाळा मतदारसंघ. याठिकाणी मदन भोसले यांनी उदयनराजे यांचं काम केलं तरी निर्णायक मतं ठरणार आहेत ती मकरंद पाटील यांची. या विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा, बँका, पतसंस्था, दूधसंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यावर मकरंद पाटील यांचं वर्चस्व आहे. सातारा लोकसभेची जागा महायुतीकडून अजित पवार गटाला मिळाली तर याठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी नीतीन पाटील यांनी केली आहे. हे नितीन पाटील म्हणजे मकरंद पाटील यांचे सख्खे भाऊ. या एकूण परिस्थितीत मकरंद पाटील यांनी शरद पवार गटातील आपले जुने सहकारी शशिकांत शिंदे यांना ताकद दिली तर उदयनराजे यांना ते महागात पडणार आहे.
साताऱ्याच्या जागेच्या या राजकीय गरमागर्मीत अजित पवार (Ajit Pawar) यांना वेगळंच महत्त्व आलं आहे. उदयनराजे यांना तिकीट देण्यापासून ते त्यांना निवडणूक जिंकवण्यापर्यंत महत्त्वाचा ठरणारा फॅक्टर म्हणजे अजितदादाच आहेत. अजितदादांनी सातारा जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात उदयनराजे यांची राज्यसभेची जागा मागितली आहे. मात्र लोकसभेत आपण जिंकूच याची खात्री नसल्याने उदयनराजे यांनी अद्याप राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. पर्यायाने अजित पवार यांनीही त्यांची कोंडी करणं थांबवलं नाही. लोकांतून निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही हे आता उदयनराजे भोसले यांना कळून चुकलेलं आहे. केवळ स्टाईलच्या जोरावर मतं मिळवता येत नाहीत आणि जरी ती मिळालीच तरी ती निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी ठरत नाहीत हे उदयनराजे यांना आता समजून घ्यावं लागेल.
अजित पवार फॅक्टरचा विचार शशिकांत शिंदे कशा प्रकारे करतात हे पाहणही रंजक ठरणार आहे. तूर्तास युतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे यांना तिकीट मिळण्यापासून ते निवडून येईपर्यंत संघर्ष करावाच लागेल ही गोष्ट पक्की आहे. आणि या संघर्षात जुने रुसवे-फुगवे विसरून अजित पवारांची मदत घेतल्याशिवाय तरणोपाय नाही हेसुद्धा त्यांना लक्षात घ्यावं लागेल हेच खरं..! तुम्हाला हे विश्लेषण योग्य वाटतंय का? उदयनराजे निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांना जवळ करतील का? तुमच्या मनातील साताऱ्याचा खासदार कोण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.