हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. काल लोकसभेत मोदी सरकारने बहुमताच्या बळावर वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) मंजूर करून घेतलं. यावेळी अमित शाह यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत उद्धव ठाकरेंनी फिरकी घेतली. तसेच मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे का? असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय?” असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. ते मातोश्रीवरील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या किरेन रिजिजू यांनी गोमास खाण्याचा समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक बिल काल मांडले हा योगायोग आहे. वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषणे भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी जिनांनाही लाजवेल अशी भाषणं केली. तुम्ही आम्हाला बाळासाहेब यांचे विचार शिकवणार? तुम्ही सांगताय मुस्लिमांच्या हिताचे बिल आहे. म्हणताय की, तुम्ही हिंदू विरोधी आहेत का? मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. आम्ही विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, हे जमिनी बळाकवणार आहेत आणि मित्रांच्या घशात तुम्ही जमिनी घालणार आहात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
अमेरिकेने भारतावर लादलेल्या २६ टक्के टॅरिफ कराबाबत सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, 15-30 दिवसांआधी अमेरिकेने सांगितलं की, तुम्ही कर कमी करा, नाहीतर आम्ही कर वाढवू. त्याप्रमाणे अमेरिकेने कर वाढवले आहे. आता शेअर बाजार कोसळला आहे. आर्थिक संकट असताना, काय पाऊले उचल्याची गरज आहे. ही भूमिका केंद्र सरकाराने घेतली पाहिजे होती. हे देशासमोर येणारं आर्थिक संकट पंतप्रधान मोदींनी सांगायला हवं होतं. त्यावर काय करायचे असं ते म्हणाले असते तर आम्ही एकमुखाने सोबत राहिलो असतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.




