हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित शाह (Amit Shah) म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज आहे अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. आज पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला . यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच हिंदुत्त्वच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी भाजपला खिंडीत पकडलं. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळेल.
उद्धव ठाकरे म्हणाले, अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह पुण्यात आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोयस? अरे नवाज शरीफची केक खाणारी तुमची अवलाद , तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय? भाजपचा सत्ताजिहाद सुरु असून सत्तेसाठी वाट्टेल ते सुरु आहे. तुमचे पूर्वज काढले तर 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. आज सुद्धा चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे? पण त्यांच्याकडे डोळेझाक करताय आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हंटल, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं, तुला आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीसच.. आणि मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.