युक्रेनचं विमान चुकून पाडलं; इराणी लष्कराने दिली कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बुधवारी युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता. त्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनचे विमान चुकून पाडलं असल्याची कबुली इराणच्या लष्करानं दिली आहे. यामध्ये १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इराणच्या लष्कराने ही मानवी चूक असल्याचं म्हटलंय.

इराणच्या सरकारी माध्यमानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी सांगितलं होतं. हे विमान तेहरान येथील विमानतळावरून उडाल्यानंतर कोसळलं होतं. या अपघातात १७६ जण ठार झाले, त्यात कॅनडाच्या ६३ नागरिकांचा समावेश होता.

या अपघाताची एक चित्रफित हाती आली होती. हे विमान पाडण्यात आल्याचे त्यातून सूचित झाले आहे त्या आधारे थ्रुडू यांनी हा आरोप केला होता. या अपघाताची आणखी एक चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. त्यात तेहरानच्या हवाई सुरक्षा बॅटरीजच्या मदतीने हे विमान पाडण्यात आल्याचे दिसून आले होतं. हा प्रकार कुठल्या हेतूने झालेला नसू शकतो, पण कॅनडातील लोकांना काही प्रश्न आहेत व त्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असंही ते म्हणाले होते.

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष पेटला असताना इराणमध्ये विमान दुर्घटना घडल्याने सुरुवातीपासूनच त्याकडे संशयाने पाहिले जात होते. इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करत २२ क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत ही विमान दुर्घटना घडली होती. यामुळे हे विमान पाडण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

 

Leave a Comment