कराड | पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत महामार्गालगत उत्तर मांड नदीच्या कडेला असणारे शिव इलेक्ट्रॉनिक्स शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी 14 एलईडी अँड्रॉइड स्मार्ट टिव्हीसह 27 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 4 लाखांचा ऐवज लंपास केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अक्षय सुभाष थोरात (रा. आगाशिवनगर ता. कराड) यांच्या मालकीचे उंब्रज येथे शिव इलेक्ट्रॉनिक्स नावाचे शोरूम आहे. अक्षय धोरात हे नेहमीप्रमाणे रात्री उशिरा दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी दुकानातील कामगार रोहन पवार व अक्षय थोरात यांनी शटर उखडले असता, दुकानातील पीओपी तोडून स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याचे दिसून आले. सदर चोरीची माहिती दुकान मालक अक्षय थोरात यांनी तातडीने उंब्रज पोलिसांना दिली.
यावेळी घटनास्थळी उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलिस कर्मचारी यांनी पंचनामा प्रक्रिया सुरू केली. तसेच घटनास्थळी सातारा येथील ठसे तज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते. सातारा उसे तज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, कर्मचारी एम. एल. नाचन, कुंभार यांनी घटनास्थळावरील विविध ठिकाणचे ठसे घेतले. सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलिस ठाण्यात सुरू होते.