कराड | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे रविवारी दि.31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात पवन पाडुरंग अंबुरे (वय- 24, रा. नरेंद्र- हुबळी, राज्य- कर्नाटक) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विनायक देवाप्पा कमडोली ( वय- 24, रा. इंगळहल्ली,कर्नाटक) असे जखमीचे नांव आहे.
उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज गावच्या हद्दीत असलेल्या तारळी पूलाजवळ पुण्याहून- कर्नाटककडे निघालेल्या दुचाकी पल्सर गाडी क्रमांक (एमएच- 14- जेक्यू- 2750) व बोलरो गाडी क्रमांक (एमएच- 10- एएन- 6080) यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी पल्सरचे मोठे नुकसान झाले असून चालक पवन यांचा मृत्यू झाला आहे. पवन हा कर्नाटक राज्यात आपल्या गावी निघाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तारळी पूलानजीक अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचले होते. यावेळी अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या अपघातात जखमी विनायक कमडोली यांच्यावर उंब्रज येथील शारदा हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास ए. आर. जमादार करत आहेत.




