साताऱ्यात अनाधिकृत 13 कॅफे सील : नगरपालिका व पोलिसांचा दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा नगरपालिकेची परवानगी न घेताच इमारत बांधकाम करणाऱ्या अनाधिकृत 13 कॅफे सातारा पालिका (Satara Municipal Corporation) व सातारा पोलिसांनी (Satara Police) सील (Seals) केले. अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेने कॅफे चालकांना यापूर्वी नोटीस (Notice) दिली होती. शहरात अनाधिकृत बांधकामे सुरु असून काही ठिकाणी मंजूर आराखड्यात बदल करुनही इमारती बांधल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. कॉफी कॅफेबद्दल नगरपालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. काही कॅफेमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यास मुभा दिली जाते. कॅफे सुरु करण्याबाबत आवश्यक असलेल्या जात परवानग्याही घेतल्या नाहीत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाने 13 जणांना नोटीस देवून आवश्यक कागदपत्रे व खुलासा मागवला होता. मात्र संबंधितांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय या कॅफेमध्ये तरुणींना प्रायव्हसी उपलब्ध करुन दिली जात होते.

त्यामुळे कंपार्टमेंट व पडदे काढून टाकण्याबाबतही नगरपालिका व पोलिस प्रशासनाने कॅफे चालकांना सुचना केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सातारा पोलिस व नगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाने कारवाई केली. त्यामध्ये कॅफे पॅराडाईज (रविवार पेठ), कॅफे स्विट कपल (रविवार पेठ), कॅफे लव्ह अॅन्ड लाटे (रविवार पेठ), कॅफे विराज (एमआयडीसी), कॅफे रेड रोझ (गोडोली), कॅफे क्युपिड (सदरबझार), कॅफे ईस्ट वेस्ट (सदरबझार), कॅफे व्हॅलेन्टाईन (सदरबझार), कॅफे ब्लॅक इन (सदरबझार), कॅफे द हीडन (एमआयडीसी), कॅफे फ्रेंड्स फाॅरएव्हर (सदरबझार), कॅफे हार्ट बीट (सदरबझार), कॅफे फ्रेंड्स (रविवार पेठ) या कॅफेंवर कारवाई केली. हे कॉफी कॅफे सेव्हन स्टार कॉम्प्लेक्स, गोडोली व विसावा नाका परिसरातील आहेत.

संबंधितांनी आवश्यक परवानगी व कागदपत्रे सादर करावीत. अन्यथा अनाधिकृत बांधकाम प्रकरणी गाळे सील करुन दंडात्मक कारवाई सुरु करणार, असा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला. सदरची कारवाई नगरपालिकेचे सतीश साखरे, प्रकाश शिर्के, श्रीकांत गोडसे, प्रशांत निकम यांच्यासह सातारा शहर पोलिस ठाणेचे राहूल खाडे, सुनिर कर्णे, विकास शिंदे यांनी केली.

Leave a Comment