सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कण्हेर धरणात पोहायला गेलेल्या मामा भाचीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील वेळे कामथी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. उदय पवार असे मामाचे नाव असून निकिता असे त्यांच्या भाचीचे नाव आहे. दोघांच्या अश्या पद्धतीने दुर्दैवी जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान श्री दत्तजयंती यात्रेसाठी कुटुंबासहित दोघे सदर ठिकाणी आले होते. यावेळी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दोघेजण धरणातील पाण्यात उतरले. काही काळ पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर निकिता अचानक गटांगळ्या खाऊ लागली. उदय यांचे तिच्याकडे लक्ष गेले असता ते तिला बाहेर काढण्यासाठी तिच्याकडे गेले. मात्र दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. यावेळी परिसरातील आणि कुटुंबाच्या हि गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तिकडे धावा केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांचा शोध लागणे अवघड जात होते. मात्र तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर उदय पवार यांचा मृतदेह सापडण्यात पोहणाऱ्यांना यश आले. मात्र त्यांची भाची निकिता हिचा काहीच पत्ता लागू शकला नाही. अजूनही तिचा जलाशयात शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. मात्र दोघांच्या अशा दुर्दैवी जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.