Wednesday, February 1, 2023

क्लस्टर योजनेअंतर्गत वाळूज येथील आठवडी बाजार होणार हायटेक

- Advertisement -

औरंगाबाद | शासनाच्या क्‍लस्टर योजनेअंतर्गत वाळूज येथील आठवडी बाजार हायटेक केला जाणार आहे. यासाठी 75 लाखांचा निधी देण्यात आला असून सर्व सोयीसुविधा मिळणार आहे. बुधवारी दि. 22 रोजी ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे यांनी याबाबत माहिती दिली.
व्यावसायिकांसाठी ओटे, निवारा, पिण्याचे पाणी, वाहनतळ व प्रशस्त रस्ते आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्या सुविधांमध्ये परिसराला नाविन्यपूर्ण स्वरूप प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले.

नगर-औरंगाबाद महामार्गाला लागून शासकीय दोन एकर जागेवर हा आठवडी बाजार भरतो. या आठवडे बाजाराच्या लिलावातून वाळूज ग्रामपंचायतीला वर्षाला तब्बल नऊ लाखांचा महसूल मिळतो, याठिकाणी नगर, जालना, बीड या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग आपली दुकाने घेऊन येत असतात. या ठिकाणी असलेल्या वाळुज वसाहतीमुळे आणि अन्य कुठल्याही ठिकाणी आठवडी बाजार भरत नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या बाजाराला खास महत्त्व आहे.

- Advertisement -

शासनाने वाळूज गावाचा समावेश श्यामाप्रसाद मुखर्जी क्लस्टर योजनेत केला आहे. या योजनेमधून आठवडी बाजार हायटेक केला जाणार आहे. त्यासाठी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून बाजार तळावरील अंतर्गत रस्ते आणि निवारा, पिण्याचे पाणी, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहे.