अमेरिकाही चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याच्या तयारीत; चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या भारतीय जवानावरील हिंसक हल्ल्यानंतर भारताने टिकटॉकसह इतर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यानंतर आता अमेरिकादेखील चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. “आता तरी या विषयावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही, काही ठरलेलं नाही. परंतु ही बाब अशी आहे की आम्ही निश्चितच विचार करत आहोत”, असं माइक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

भारताची चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’
केंद्र सरकारने टिकटॉक या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची डेटाचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.

Leave a Comment