धक्कादायक ! मॉनिंग वॉकला गेलेल्या दोघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील खिर्डी या ठिकाणी हा अपघात घडला आहे. यादरम्यान आरोपी वाहन चालकाने दोन युवकांना धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे. राजुरा- आदिलाबाद महामार्गावर हा अपघात घडला आहे.

धनराज मालेकर आणि शेखर ढवस अशी या मृत पावलेल्या मित्रांची नावे आहेत. यातील धनराजचं वय 34 तर शेखर ढवस यांचं वय 33 वर्ष होतं. या अपघातानंतर मालेकर आणि ढवस या दोन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी काही काळ रास्ता रोको केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण मिळवले.

पाच वर्षांपूर्वी 2017 साली देखील भरधाव चारचाकी कारने दोघांना चिरडले होते. उर्जानगरच्या पुलाजवळ हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघेजण जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रपुरात मॉर्निगला गेलेल्या दोघांवर काळानं घाला घातला आहे. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेनं संतापलेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी फरार कार चालकाचा शोध सुरु केला आहे.