पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या महिलेवर ऑफिसमध्येच प्राणघातक हल्ला

बारामती : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर ऑफिसमध्ये घुसून चाकूने वार करण्यात आले. आरोपीने चाकूने या महिलेच्या हातावर वार केल्याने हि महिला जखमी झाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी केसरी टूर्सचं ऑफिस आहे. याच ऑफिसमध्ये फिर्यादी महिला पर्यटनाचं बुकिंग करण्याचं काम करते. यादरम्यान आज सकाळी एका अज्ञात तरुणाने ऑफिसमध्ये शिरून या महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले.

नेमकं काय घडलं?
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास केसरी रजत टूर्सचं ऑफिस उघडल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. तुम्ही लवकर ऑफिस बंद केलं’, असं म्हणत फिर्यादी महिलेच्या गळ्यात हात घातला. यानंतर फिर्यादी महिलेने त्याचा हाथ धरून ठेवला. यानंतर आरोपीने माझा हात सोड असे म्हणत त्याने महिलेवर चाकुने वार केले. यानंतर या महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयन्त केला पण आरोपी तरुण आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला.