Unlock 1.0 | पुणे शहरात काय सुरु राहणार? काय बंद राहणार? 

पुणे । देशात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात संचारबंदीचे बरचसे नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने  होणार आहेत. पुणे शहर हे  देशातील १३ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी असल्यामुळे येथील कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन केले जाणार असले तरी इतर परिसरात संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यांच्याबरोबर काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक ही सुरु होण्याची शक्यता आहे. पीएमसी आणि रिक्षा सुरु होतील असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

एकाच ठिकाणी ५ रुग्ण असतील तर तेथील इमारत किंवा बैठी घरे ही  कंटेन्मेंट झोनमध्ये जातील. पुण्यातील काही भागात फारसे रुग्ण आढळले नाहीत त्यामुळे अशा परिसरात सर्व कामकाज सुरळीत सुरु होतील. यामध्ये औंध, बाणेर-बालेवाडी, कोथरूड, पाषाण, सिंहगड या भागांचा समावेश आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या १०० मीटरच्या परिसराला कंटेन्मेंट झोनमध्ये गणलं जाईल पण पूर्वीच्या कंटेन्मेंट झोनमधील रुग्ण कमी झाले असतील तर तेथील नियम शिथिल केले जातील अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संचारबंदी वाढविली असली तरी कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतरत्र नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्य शासनाला निर्णय घेण्यास स्वातंत्र्य दिले असल्यामुळे कंटेन्मेंट झोनबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल अशी माहिती दिली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये काटेकोर निर्बंध असल्याने तेथील रहिवाशाना किमान जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी प्रशासन अशी दुकाने पूर्णवेळ उघडण्याची परवानगी देऊ शकते.