बिनविरोध निवड : भावाची साथ… बहिणीची बाजी अन् शिवसेनेचा झेंडा फडकला

दहिवडी | नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या सुरेखा पखाले या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. सातारा जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक व शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची साथ अन् बहिणीची नगरसेविका पदाची बाजी मारली अन् शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.

दहिवडी नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांची निवडणूक झाली असून आता 4 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. नुकत्याच दहिवडीच्या नागरिक व मतदार झालेल्या सुरेखा पखाले यांनी प्रभाग क्रमांक 1 व 17 मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूकीत रंगत आणली होती. बहिणीला निवडून आणण्याचा चंग बांधलेल्या शेखर गोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र निवडणूक टाळून बहिणीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी हालचाली गतिमान केल्या होत्या.

शेखर गोरे यांच्या पडद्याआड सुरु असलेल्या हालचालींना यश आले. अखेर भाजपच्या वंदना कटपाळे व काँग्रेसच्या कांता पोळ यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली होती. तर माघारीसाठी खळखळ करणाऱ्या राष्ट्रवादी प्रियांका पोळ यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. विरोधातील सर्वच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सुरेखा पखाले यांना शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळाला. सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. भाऊ शेखर गोरे यांची साथ आणि बहिण सुरेखा पखाले याची बाजी अन् शिवसेना पक्षाचा झेंडा असे समीकरण जुळून आले आहे.