दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
माण पंचायत समितीच्या उपसभापती पदी नितीन राजगे यांची आज बिनविरोध निवड झाली. तानाजी कट्टे यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून 24 ऑगस्ट रोजी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा तालुक्यात सुरु होती. परंतु युवकांना संधी द्यावी अशी सर्वपक्षीय मागणी होती. नितीन राजगे यांना 2021 मध्ये सभापतीपद द्यायचे सर्वपक्षीय यांच्याकडून ठराविले होते. 26 ऑगस्ट रोजी रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज उपसभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
पिठासीन अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदरची सभा सकाळी 11 वाजता सुरु झाली. सभेस गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, रमेश पाटोळे, विजयकुमार मगर, नितीन राजगे, तानाजी काटकर, कविता जगदाळे, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर उपस्थित होते. उपसभापती पदासाठी नितीन राजगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सदर अर्जावर सुचक म्हणून तानाजी काटकर यांनी सही केली होती. विहित वेळेनंतर शैलेश सुर्यवंशी यांनी नितीन राजगे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित उपसभापती नितीन राजगे म्हणाले, माण पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी काम करणार आहे सहकारी पंचायत समिती सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. प्रशासकीय कर्मचारी यांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने काम करणार आहे.