बिनविरोध निवड : फलटण पंचायत समितीच्या सभापती विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर

फलटण | फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा वाठार निंबाळकर गणाचे सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर तर उपसभापतीपदी सांगवी गणातील संजय भगवानराव सोडमिसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व उसभापती रेखा खरात यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सोमवारी दि. 29 रोजी विशेष सभा बोलावण्यात आली होती. अर्ज दाखल व छाननी झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सदर निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

तब्बल 24 वर्षांनी राजघराण्यातील व्यक्ती सभापतीपदी

तब्बल 24 वर्षांनंतर श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या रुपाने फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदावर फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील व्यक्ती विराजमान झाली आहे. यापूर्वी दिनांक 14 मार्च 1992 ते 13 मार्च 1997 या कालावधीमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सभापतीपद भूषविले होते. श्रीमंत संजीवराजेंच्याप्रमाणे माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे (सन 1962 ते 1967), माजी आमदार चिमणराव कदम (1967 ते 1979) या दिग्गजांनीही फलटण पंचायत समितीचे नेतृत्त्व केलेले आहे. त्यामुळे तालुक्याचे महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर श्रीमंत विश्‍वजीतराजे या युवा नेतृत्त्वाला मिळालेली संधी महत्त्वाची मानली जात आहे.