परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थाच्या हत्येचा उलगडा

सीसीटीव्हीच्या आधारे मारेक-यास अटक

औरंगाबाद | परीक्षेसाठी शहरात आलेल्या विकास चव्हाण या तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला असून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याने त्याने आरोपीला लिफ्ट मागितली. मात्र त्या दुचाकीस्वाराने स्मशानभूमीत नेत त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी शाहरुख फिरोज खान (वय-२८ रा. पोस्ट ऑफिसजवळ, जुनाबाजार) यास सिटीचौक पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ८ वाजता मृत विकासची परीक्षा असल्याने त्यास केंद्रावर वेळेत पोहोचणे गरजेचे होते. खिशात पैशाची चणचण असल्याने हॉटेल, लॉज न करता तो रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकातच झोपला होता. पहाटे चार वाजेला झोपेतून उठल्यावर तो केंद्राकडे जाण्यासाठी रिक्षा शोधत होता. मात्र चिकलठाण्याकडे जाण्यास रिक्षा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तो तेथेच उभा राहिला. हा सर्व प्रकार आरोपी शाहरुख पाहत होता.त्याने विकासला विश्वासात घेत केंद्राकडे सोडून देतो, असे म्हणत दुचाकीवर बसवले. त्यानंतर आरोपीने त्यास महापालिकेच्या मुख्यालयाजवळील स्मशानभूमीत नेले. त्यामुळे विकासच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मात्र विकास एका हाताने दिव्यांग असल्याने आरोपीने त्याला कब्रस्थानातील गेटमधून आत ओढले. त्यानंतर दोघांत झटापट झाली.

दरम्यान, आरोपी शाहरुखने धारदार शस्त्राने विकासाच्या पोटावर, गळ्यावर वार केले. त्यातच तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला. त्यानंतर आरोपीने त्याच्या खिशातील रोख रक्कम व वस्तू घेऊन तेथून पोबारा केला. बसस्थानक परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसत असल्याने पोलिसांनी त्याची खब-यामार्फत माहिती काढत त्याला भडकलगेट परिसरातून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

You might also like