चंद्रपूर प्रतिनिधी। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तलाठी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले असून पटवारी संघाने पुन्हा एकदा बेमुदत रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याआधी विधानसभा निवडणुकीपुर्वी तलाठ्यांच्या पदोन्नती तसेच इतर आर्थिक मागण्यांसंदर्भात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तसेच भारतीय लोकशाहीचा महोत्सव म्हणजेच निवडणुकांचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी तलाठ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र यावेळी विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी आक्रमक झालेले दिसत होते.
सध्या निवडणूका पार पडून राज्यात नविन सरकार पदारूढ झाले आहे, त्यापुर्वी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी बांधवांचे हाल होत असल्याने, आधी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्राधान्याने पंचनामे व इतर कार्य पुर्ण करुनही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. वारंवार समस्या निदर्शनास आणुन दिल्यानंतरही योग्य तोडगा काढण्यास जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यावेळी विदर्भ पटवारी संघाचे राजुरा तालुका अध्यक्ष सोहेल अन्सारी, उपाध्यक्ष सुनिल रामटेके, सचिव दिपक गोहणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गेडाम आदी उपस्थित होते