औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. काही ठिकाणी कुत्रे दुचाकीच्या मागे पळताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे एक कुत्रा मोपेडच्या मागे लागल्याने तोल जाऊन पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना 14 जुलै रोजी पदमपूऱ्यात घडली. शैलजा विनोद कुमार काला वय 61, (रा.पदमपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे, 13 जुलैला जखमी झाल्या होत्या.
विनोद कुमार काला हे उद्योजक आहेत, त्यांची पत्नी शैलजा 13 जुलै दुपारी बारा वाजेच्या सुमारास बाजरात गेल्या होत्या. गाडीवरून जाताना घराजवळच रस्त्यावरील मोकाट कुत्रे त्यांच्या गाडीच्या मागे लागले, कुत्रे जोरजोरात भुंकत असल्याने शैलजा घाबरून गेल्या. आणि त्यांचा तोल गेला असता त्या जमिनीवर कोसळल्या. जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या तिथेच बेशुद्ध झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कुटूंबाच्या मदतीच्या सहाय्याने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वेदांतनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार यू. पी. जाधव हे या घटनेचा तपास करीत आहेत. अशा अनेक प्रकारच्या घटना सतत घडत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच जात आहे. लहान मुलांचे लचके तोडण्याच्या अनेक घटना या पूर्वी घडल्या आहे. मनपाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. तरी देखील कुत्रे पकडण्याचे काम अधून-मधून सुरू आहे.मात्र शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाहीये. यातील अनेक कुत्रे गाडीच्या मागे धावतात. बीड बायपास, टीव्ही सेंटर , मुकुंदवाडी, एन-6, अश्या अनेक भागातील रोडांवर मोकाट कुत्रे सर्वाधिक आहेत.