पिलिभीत । दिल्लीतील शेतकरी आंदोलन दरम्यान जीव गमावलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा मृतदेह तिरंग्यात लपेटण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडून शेतकऱ्याच्या पत्नीवर आणि भावावर ‘राष्ट्रध्वजाचा अपमान’ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिलीभीतच्या भोपटपूर गावाचा रहिवासी असलेला हा तरुण शेतकीर गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. बलविंदर सिंह असं या शेतकऱ्याचं नाव होतं. तो आंदोलन स्थळावरून बेपत्ता झाला होता. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून तीन दिवस ‘बेपत्ता’ राहिल्यानंतर या ३२ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह दिल्लीतील एका रुग्णालयात आढळला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेला ३२ वर्षीय बलविंदर सिंह गाझीपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून २३ जानेवारीला बेपत्ता झाला होता. १ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांकडून आलेल्या फोननंतर बलविंदर सिंह याचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचली होती. रस्ते अपघातात बलविंदरचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. यानंतर मंगळवारी, २ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदनानंतर बलविंदरचा मृतदेह दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री रुग्णालयातून कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. बुधवारी गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, मृतदेह तिरंग्यात लपेटलेल्या अवस्थेत समोर आला होता.
सोशल मीडियावर बलविंदरचा मृतदेह तिरंग्यात लपेटलेल्या अवस्थेत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मृत बलविंदरची पत्नी जसवीर कौर, भाऊ गुरविंदर सिंह तसंच आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे, बलविंदरचा मृतदेह तिरंग्याखाली ठेवण्यामागे कारण होतं. ज्या प्रमाणे जवान सीमेवर लढत आहेत त्याप्रमाणे शेतकरी आपल्या देशासाठी लढत आहेत, असा आमचा विश्वास आहे. बलविंदर हा शेतकऱ्यांसाठी हुतात्मा झाला. या माध्यमातून देशभक्तीचच उदाहरण समोर ठेवलं, अशी प्रतिक्रिया गुरविंदर सिंह यांनी व्यक्त केलीय.
याशिवाय, कुटुंबीयांकडून बलविंदर यांच्या मृत्यूबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात मिळाला तेव्हा मृताच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत होत्या. रस्ते अपघातात मृत्यू झाला असता तर शरीरावर अनेक जखमा आणि अनेक ठिकाणी फ्रॅक्चरही दिसायला हवं होतं’ असं बलविंदर यांचे मोठे बंधू वीरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.