US Election:राजकीय वारं बदलणाऱ्या ‘त्या’ वादळी सभेची पुनरावृत्ती थेट अमेरिकेत; बायडन यांचं भर पावसात जोरदार भाषण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फ्लोरिडा। वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांची साताऱ्यातील ती भर पावसातील वादळी सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दी जागची हलली नाही. या एका सभेनं संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलवून टाकले होते. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पवारांनी सामागून पराभव तर केलाचं. पण विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा मोठा फायदा झाला. आता अशीच एक सभा अमेरिकेत झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत गाजत आहे.

अमेरिकेत ३ दिवसांनंतर मतमोजणी आहे. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावला आहे. नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे.

बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे पाठिराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही, अशा प्रकारची ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहेत. अनेकांना बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. ‘हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल,’ असं शीर्षक त्यांनी फोटोला दिलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment