अमेरिका-तालिबान शांतता कराराचा आज भारत बनणार साक्षीदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ९/११ हल्ल्याला १९ वर्ष  झाले असतांना आज अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक महत्त्वपूर्ण शांतता करार होणार आहे. या कराराची खास बाब म्हणजे तालिबानशी संबंधित प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या एक दिवस अगोदर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला काल शुक्रवारी काबूल येथे आले. यावेळी शांतता व स्थिर अफगाणिस्तानासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी अफगाणिस्तानाचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री हारुन चाखनसुरी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शांतता कराराबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनाविषयी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रतिबद्धतेविषयी त्यांना माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”श्रृंगला आणि आरोन यांनी द्विपक्षीय सामरिक भागीदारीचा आढावा घेतला आणि त्या कामांचे सकारात्मक मूल्यांकन केले. आज दोहामध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात करारावर स्वाक्षरी होणार असून, यामुळं १८ वर्षांनंतर अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कुमार यांनी ट्वीट केले, ”परराष्ट्र सचिवांनी शाश्वत शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी अफगाणिस्तानातील लोकांच्या प्रयत्नात भारताचे पूर्ण सहकार्य व्यक्त केले.”

अफगाणिस्तानात शांतता व सलोखा प्रक्रियेतील भारत हा एक महत्त्वाचा पक्षकार आहे. भारताचे राजदूत पी. ​​कुमारन अमेरिका आणि तालिबान शांतता करारावर स्वाक्षऱ्या करणार असलेल्या कतारमधील समारंभात सहभागी होतील. तालिबानशी संबंधित कोणत्याही प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. नोव्हेंबर २०१८ मध्ये भारताने मॉस्कोमध्ये अफगाण शांतता प्रक्रियेसाठी “गैर अधिकारीक” क्षमतेचे दोन माजी मुत्सद्दी पाठविले होते. रशियाने या परिषदेचे आयोजन केले होते ज्यात अफगाणिस्तान, अमेरिका, पाकिस्तान आणि चीनसह तालिबान्यांचे उच्चस्तरीय प्रतिनिधी आणि इतर अनेक देशांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली होती. शांतता करारापूर्वी भारताने अमेरिकेला सांगितले आहे की, जर अमेरिका पाकिस्तानवर आपल्या भूमीवरून सुरू असलेल्या दहशतवादी नेटवर्क बंद करण्यासाठी दबाव आणत असेल तरच भारत अफगाणिस्तानात शांततेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य करेल.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment