क्रीडानगरी | योगेश जगताप
शनिवारी सायंकाळी झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाका हिने २३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विलीयम्सचा पराभव केला. मातृत्वानंतर विजेतेपद मिळवण्याचं सेरेनाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ओसाका ही ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी जपानची पहिलीच खेळाडू ठरली. या सामन्यात पंच सदोष कामगिरी करतायत, ही तक्रार करुन सेरेनाने पंचांशी हुज्जत देखील घातली. या कृत्याबद्दल तिला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविकने अर्जेंटिनाच्या ज्यूआन मार्टिन डेल पोट्रोचा पराभव करत आपले १४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. तब्बल ९ वर्षांनी अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी खेळणाऱ्या डेल पोट्रोला नोवाकने पूर्णपणे निष्प्रभ केले. यंदाच्या वर्षातील नोवाकचे हे दुसरे विजेतेपद आहे. मागील २ वर्षांत रॉजर फेडरर, राफेल नदाल यांनी प्रत्येकी ३, नोवाक जोकोविकने २ विजेतेपद आपल्या नावावर केली आहेत.