‘जगण्यातील साधेपणा जपणारा राजकारणातील अपराजित योद्धा – आर.आर.पाटील’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोष्टी राजकारणापलीकडच्या । जुगाडू बाबूराव

देशभरात लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधींच्या जयंतीचा माहोल असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील एका साध्या नेत्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. साधेपणा हा आजचा माझ्या गोष्टीचा विषय. एखादा माणूस गरीब असला की साधा राहतो का? गरिबी म्हणजे फक्त पैशाला मिंधं असणे, खाण्या-पिण्याची आबळ असणे का ? थोड्याबहुत प्रमाणावर हे खरंच आहे बरं का..!! तर ही गोष्ट आहे दोन मित्रांची. आणि त्यापुढे जाऊन एका साहित्यिक पत्रकाराची आणि एका प्रामाणिक राजकीय नेत्याची. सांगलीच्या एका कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची ओळख झाली. एक जण अभ्यासात प्रचंड हुशार. बोलका. शिक्षकांचा लाडका आणि महत्वाचं सगळ्यांना सांभाळून घेणारा. दुसरा मितभाषी. कुणाच्या तरी उपकाराने आपण शिकू शकतोय ही भावना मनात बाळगलेला. मेस लावायला पैसे नाहीत म्हणून उपाशी राहणारा दुसरा कार्यकर्ता. तर अभ्यासात हुशार असणाऱ्या कार्यकर्त्याला जेमतेम त्याच्यापुरता का होईना घरून डबा येत होता. कमी बोलक्या मित्राच्या रूमवर हा हुशार कार्यकर्ता गेला असता दोरीवर टांगलेल्या भाकऱ्या त्यानं पाहिल्या. “हे रे काय ? त्यानं विचारलं. गरीब मित्र म्हणाला, “मेस लावायला पैसे नाहीत दोस्ता. आठवड्यातून एकदा आई घरून भाकऱ्या करून पाठवते. रोज त्याच्यावरच थोडं पाणी मारतो, त्याला मीठ लावतो आणि खातो. आठवडाभर खायच्या त्याच भाकऱ्या पुरवून” दुसऱ्या मित्राच्या डोळ्यांत पाणी तरळलं – मी असताना आता तुला कोरड्या भाकऱ्या खायची गरज नाही, माझ्या डब्यातील कालवण आता दोघांनी खायचं म्हणत दोघांनीही भाकरी-कालवणावर आपली मैत्री पुढे नेली आणि आयुष्यभर जपलीसुद्धा.

भाकऱ्या घरून मागवणारा गरीब मित्र पुढे सामाजिक समतेची वाट चोखाळणारा साहित्यिक पत्रकार बनला तर अभ्यासात हुशार असणारा पुढे जाऊन आपल्यातील भाषण कौशल्यावर आधी जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर आमदार बनला. आमदार झाल्यानंतरचा असाच एक किस्सा आहे. हॉटेलातील खाणं आपल्या ऐपतीची गोष्ट नाही हे मनात पहिल्यापासून साठवलेला हा माणूस. आमदार झाल्यावर मित्रांनी पार्टी मागितली. आधी मित्रांनी कधीही पार्टी मागितली तर ‘पैसे नाहीत’ हे कारण देऊन हा माणूस वेळ मारून न्यायचा. आमदार झाल्यावर मात्र तुम्हाला पाहिजे ते खावा असं म्हणत हा माणूस मित्रांना पार्टीला घेऊन गेला. मित्रांनी जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर जेवणाचं बिल किती होईल ते या व्यक्तीनं हॉटेलच्या काऊंटरवर विचारलं आणि तिथून निघून गेला. अर्ध्या तासाने हा व्यक्ती परत आला आणि जेवणाचं बिल चुकतं केलं. मित्रांनी विचारलं, आम्हाला सोडून कुठं गेला होतास रे – त्या माणसानं उत्तर दिलं. पैसे आणायला. आधीच मी फाटका माणूस, कुणी कधी पार्टी मागितली तर पैसे नाहीत म्हणणारा. आज स्वतःहून तुम्हाला जेवायला बोलावलं आणि लक्षात आलं की पैसे कमी पडतायत. मग काय आमदार निवासाकडं गेलो आणि तिथल्या एकाकडून हातउसने पैसे घेऊन आलो. जेवणात तुम्हाला काही कमी पडलं नाही ना ? असं विचारणारा हा माणूस स्वतः मात्र जेवणाचं बिल आणखी वाढू नये म्हणून गडबडीत उरलं सुरलं पटापट खाऊन मोकळा झाला.

आज सरपंच, नगरसेवक आणि साध्या-सुध्या निवडणूका जिंकणारे लाखोंची-करोडोंची संपत्ती जमवतात. आपल्या पूर्ण हयातीत जेवढं गरजेचं तेवढंच मिळवणारा हा आमदार पुढे महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा झाला. रावसाहेब रामराव म्हणजेच आर.आर.पाटील हे त्यांचं नाव. आपण राज्याचे नेते आहोत हे ओळखून मिळालेल्या सुट्टीत घरी जाण्याऐवजी हा माणूस महाराष्ट्रभर फिरायचा. दुर्गम भागांतील समस्या समजून घ्यायचा. त्यासाठी काम करायचा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, डान्सबार बंदी, गडचिरोलीतील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका ही आबांच्या काळातील उल्लेखनीय कामं आहेत. विधानसभेमध्ये ९९% उपस्थित राहणारे आबा, अभ्यासपूर्ण चर्चा करून विषयाचं गांभीर्य अवघ्या महाराष्ट्राला पटवून देत होते. गावाकडे लाल दिव्याच्या गाडीतून उतरल्यानंतर आहे ती शेतीची कामं उरकायला आबा पळायचे. मुलांच्या कॉन्व्हेंट शाळेचा खर्च झेपणार नाही, त्यापेक्षा सामान्य लोकांच्या पोरांसोबतच आपली पोरं चांगली शिकतील हा विचार अंगीकारत जिल्हा परिषद शाळांतून मुलांना शिक्षण देण्याचं काम आबांनी केलं. साधेपणा तो यापेक्षा वेगळा काय असणार. भाकरी कालवनाची मैत्री जपणाऱ्या साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे यांनी ‘काळजातले आर.आर.आबा’ या पुस्तकात त्यांच्या आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. तुम्हाला आणखी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की वाचा. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणापलीकडील व्यक्ती कशा असतात हे सांगण्याचा हा छोटा प्रयत्न. पुन्हा भेटू लवकरच. दुसऱ्या जुगाडासह..!!

Leave a Comment