धक्कादायक ! लग्न समारंभातून चिमुकलीला पळवून तिची बलात्कार करून हत्या

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील आग्रामधील मलपुरा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका लग्न समारंभातून लहान मुलीचं अपहरण केल्यानंतर तिची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या लग्नस्थळापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर चिमुरडीचा मृतदेह आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह आढळला तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. यानंतर चिमुरडीच्या कुटुंबीयांनी आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मलपुरा भागात बुधवारी एक लग्न होते. या लग्नाला वधूचा चुलत भाऊ आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह लग्नाला आला होता. रात्री 11 वाजेपर्यंत आपली मुलगी डीजेवर डान्स करत होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.

शोधाशोध करुनही ती कुठेच सापडली नाही. सकाळपर्यंत ती बेपत्ता असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. यानंतर या मुलीचा मृतदेह शेतात आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप या मुलीच्या वडिलांनी केला आहे. यानंतर लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

You might also like