हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघाताची घटना (Uttarakhand Mini Bus Accident) घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावर एक मिनी बस अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे भाविक चारधाम तीर्थयात्रा संपवून ऋषिकेशला परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या मिनी बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
मिनी बस सुमारे 250 फूट घसरल्याने घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. घटनास्थळी तातडीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघातग्रस्त मिनी बसमधून दिल्लीतील लोक प्रवास करत असल्याची माहिती आहे. भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केलं जात आहे.
#WATCH | Uttarakhand: A tempo traveller, with about 17 passengers on board, fell into a deep gorge near Badrinath Highway in Rudraprayag. Rescue work is being carried out by SDRF and Police team. So far, two injured have been sent to the hospital by the team through ambulance.… pic.twitter.com/5v9nhLFL4B
— ANI (@ANI) June 15, 2024
या अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, – रुद्रप्रयागमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं.