Sunday, June 4, 2023

दिव्यांग व बेघरांसाठी नऊ केंद्रावर लसीकरण सुरु

औरंगाबाद : शहरात दिव्यांग आणि बेघर नागरिकांसाठी महापालिकेच्यावतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नऊ ठिकाणी हे लसीकरण केले जाणार आहे. 12 जून पर्यंत हे लसीकरण चालणार आहे.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाकडून कोरना प्रतिबंधक लसीकरण यावर भर दिला जात आहे. त्यासाठी शहरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरण सुरू आहे.
लसीकरणासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखे ओळखपत्र बंधनकारक आहे. मात्र शहरातील रस्त्यावर फुटपाथवर रात्रनिवारा या वृद्धाश्रमात राहणार्‍या बेघर व्यक्तीकडे कुठलेच ओळखपत्र नसते. त्यांची अडचण विचारात घेऊन महापालिकेने त्यांची वेगळी नोंदणी करून त्यांना लाच देण्याचे ठरविले आहे. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. दिव्यांगाना वेळ लसीकरणासाठी ताटकळत बसावे लागू नये यासाठी त्यांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार दिव्यांग, बेघरांसाठी, गरीब भिकारी यांच्यासाठी सात जून ते 12 जून या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्व नऊ प्रभागात प्रत्येकी एक एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. तिथे दिव्यांग आणि बेघर व्यक्तींना कोविशिल्डचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

ही आहेत लसीकरण केंद्रे :
भीम नगर आरोग्य केंद्र, गांधी नगर आरोग्य केंद्र, बायजीपुरा आरोग्य केंद्र, चेतना नगर आरोग्य केंद्र, सिडको एन 8 आरोग्य केंद्र, चिकलठाणा आरोग्य केंद्र, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र, सिल्क मिल कॉलनी आरोग्य केंद्र, आणि बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र या ठिकाणी हे लसीकरण केले जाणार आहे.