औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 95.14 टक्के आहे. मात्र म्युकर मायकोसिसने मृत्यू होणाऱ्याची संख्या चिंता वाढवत आहे. हा आजार होऊ नये आणि झाला तर तत्परतेने औषधोपचार मिळाले पाहिजे त्यासाठी डॉक्टरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा, वेबिनारचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिली. दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी शिक्षणासाठी परदेशात जिल्ह्यातून जवळपास चारशे विद्यार्थी जाणार आहेत. त्यांना प्राधान्याने तात्काळ लसीकरण करावी त्यामुळे त्यांचा शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी सूचना केली. त्यावर महापालिका आयुक्तांनी लवकरच या विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्यात येईल,असे यावेळी सांगितले.
कोविडबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक झाली. खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, संजय शिरसाट, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, की शिक्षणासाठी विदेशात जाताना त्यांना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे.यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहेत. पण शासनाने सूचना केलेल्या नाहीत. पण जिल्हा ट्रांसपोर्ट समितीच्या बैठकीत या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कोविन ॲपवर अशा विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. विदेशात शिक्षणासाठी प्रवेश झाल्याचे पत्र लवकर येण्यासाठी आवश्यक आहे. सोबतच प्रवेशासाठी सादर केलेली कागदपत्रे, पासपोर्ट लस घेण्यासाठी सोबत आणावी.
तीन केंद्रांवर होणार लसीकरण :
बन्सीलाल नगर, चेतनानगर आणि नाथ सुपर मार्केट, औरंगपुरा या आरोग्य केंद्र लसीकरण याची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन ते पाच जून दरम्यान तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार असल्याचे डॉक्टर पाडळकर यांनी सांगितले दहा हजार दिव्यांगांसाठी व्यवस्था शहरातील दिव्यांग, गतिमंद असलेल्या सुमारे दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक झोनमधील एका केंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे असे डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले.