औरंगाबाद | शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे लसीकरण गतीने व वेगाने झाले पाहिजे म्हणून यापुढे शहरात एक तर ग्रामीण भागात दोन या प्रमाणात लसीचे वाटप होणार आहे. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लसीकरणाबाबत माहिती देताना चव्हाण म्हणाले शहरात लसीकरण होतच आहे. पण ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणला वेग येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आत्तापर्यंत 3 लाख 65 हजार 36 नागरिकांना पहिला तर 97 हजार 897 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात 32 लाख 86 हजार 814 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात महापालिका हद्दीतील 11 लाख 76 हजार 999 तर ग्रामीण भागात 21 लाख दहा हजार 815 नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील 9 लाख 66 हजार 493 नागरिकांचे लसीकरण झाले आहेत. यात सात लाख 43 हजार 696 नागरिकांनी पहिला तर दोन लाख 22 हजार 896 जणांनी दोन डोस घेतले आहेत.
ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे .आठवी ते बारावी पर्यंत ज्या शाळा आहे त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येईल. शहरापेक्षा ग्रामीण भागाची लोकसंख्या अधिक असल्याने ग्रामीण भागातील लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे लसीचे वाटप होईल असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.