वाढे फाट्यावर वैभव ट्रव्हल्स पलटी, सहाजण जखमी

सातारा | पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहराजवळ वाढे फाटा येथे आज पहाटे प्रवासी घेऊन निघालेली वैभव ट्रॅव्हल्स पलटी झाली. या दुर्घटनेत सुमारे सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दि. 5 रोजी पहाटे पुणेहून कोल्हापूरकडे निघालेली वैभव कंपनीची ट्रव्हल्स (एमएच- 09- ईल- 3213) पलटी झाली. सातारा नजीक वाढे फाटा येथे ट्रॅव्हल्स आल्यानंतर कंटेनरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला व ट्रॅव्हल्स पलटी झाली. पहाटे महामर्गावर व्यायामसाठी आलेल्या परिसरातील नागरिकांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले.

सातारा पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही.

You might also like